मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तातडीची बैठक, राजकीय चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे कर्ते सर्वते शरद पवार यांचा विरोध असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक तातडीने बोलविण्यात आली आहे. शरद पवार हे नाशिकला वकिल परिषदेच्या समारोपाला उपस्थित राहण्यासाठी आले असताना तातडीने ते मुंबईला गेले. जळगाव येथे बोलताना त्यांनी हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे सांगत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची तातडीने बैठक बोलविली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बैठक घेण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शरद पवार यांचा विरोध असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला अधिकार वापरुन एल्गारचा तपास एनआयएकडे सोपविण्यास मान्यता दिली आहे. त्यावरुन शरद पवार नाराज आहेत. त्यांनी कोल्हापूर आणि नंतर जळगाव येथे आपली नाराजी उघड केली आहे. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. आता एनआयएकडे तपास सोपविला तरी, राज्य शासन त्यातील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करु शकते, असा शरद पवार यांचा दावा आहे. भाजपाला काही तरी लपवायचे होते. त्यासाठी हा तपास एनआयएकडे सोपविला, असे शरद पवार यांनी जळगाव येथे सांगितले होते.

त्यामुळे एल्गार परिषदेतील पोलिसांच्या सहभागाची चौकशी करावी, यासाठी ठाकरे यांच्यावर दबाव आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दर महिन्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ मंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक ८ दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आली होती, असे सांगण्यात येत आहे.