आघाडीच्या बैठकीत ‘एकजुटी’वर भर ; दुष्काळावर आक्रमक भूमिका घेणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधकांना खडबडून जाग आली असून त्यांनी विधानसभेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. याचाच भाग म्हणून काल सर्व विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत येणाऱ्या विधानसभेसाठी जोरदार तयारी तसेच आगामी निवडणूक पूर्ण ताकदीने आणि एकजूटीने लढण्याचा निर्धार करण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणूक आणि १५ दिवसांवर असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची बैठक झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्या निवास्थानी हि बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, नसीम खान, विजय वडेट्टीवार, सुनिल तटकरे, अबू आझमी, रवी राणा, हसन मुश्रीफ, शेकापचे जयंत पाटील, गणपतराव देशमुख, आदींसह आघाडीचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयश विसरून विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्याची चर्चा देखील झाली. त्याचबरोबर राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना राज्यकर्ते याकडे गांभीर्याने बघत नसल्याने येत्या अधिवेशनात या विषयावर रान उठवण्याचा देखील निर्धार या बैठकीत करण्यात आला. या विषयी सरकारला घेरण्यासंबंधी देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यांच्याबाबत देखील या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मनसेबाबत चर्चा नाही – जयंत पाटील

त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला आम्ही बरोबर घेण्यास तयार आहोत, मात्र त्यांच्याकडून अजून काही प्रातिसाद आलेला नाही. त्याचबरोबर मनसेला बरोबर घेण्याच्या बाबतीत आजच्या आजच्या बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये आता आघाडी विधानसभेला किती मोठी भरारी घेते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.