ससूनच्या विविध विभाग प्रमुखांसोबत बैठक ! कोरोना बाधित रुग्णांवर नियोजनपूर्वक वैद्यकीय उपचार करावेत : आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून कोरोना संशयित व बाधित रुग्णांवर नियोजनपूर्वक वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ससून रुग्णालयाच्या विभागप्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला पशुसंवर्धन आयुक्त तथा ससून रुग्णालयाचे समन्वय अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे, उप अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते, प्रा. डॉ. हरिश टाटीया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. निरंजन तेलंग, भुमि अभिलेख विभागाचे जिल्हा अधिक्षक तथा समन्वय अधिकारी राजेंद्र गोळे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून पुण्यातील रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे ही चिंतेची बाब आहे. तथापी रुग्णांवर वेळेत आणि योग्य प्रकारे उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी सुक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना प्रतिबंधासाठी विविध टप्पे निश्चित करुन त्या-त्या विभागप्रमुखांनी व डॉक्टरांनी आपली भुमिका चोखपणे पार पाडावी. रुग्णांचे स्वॅब तपासणीच्या नमुन्यांचा अहवाल वेळेत पाठविण्यात यावा, जेणेकरुन रुग्णांवर लवकरात लवकर उपचार करणे सोयीस्कर होईल.

कोरोनाच्या वैद्यकीय सेवेसाठी नियुक्त डॉक्टर, परिचारीका यांना ये – जा करण्यासाठी बसेसची सोय करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या राहाण्याच्या व जेवणाची सोय देखील रुग्णालय परिसरातील हॉटेल्समध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना संशयित व बाधित असणाऱ्या लहान मुलांवर डॉक्टरांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, तसेच त्यांच्या समुपदेशनावर भर द्यावा.

कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सूसनमध्ये आजवर तपासणी करण्यात आलेले रुग्ण, संशयित रुग्ण संख्या, बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी, समुपदेशानासाठी तयार करण्यात आलेल्या हेल्पलाईन वरुन दिली जाणारी माहिती, पीपीइ किट, व्हेंटीलेटर्स, आदींची उपलब्धता, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग, कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहामुळे संसर्ग होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता आदि विषयांबाबत चर्चा करुन आवश्यक त्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.