शरद पवारांकडून शिक्षकांना मोठा दिलासा, प्रश्नांबाबत 15 दिवसांत बैठक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षकांच्या मागण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघ काम करीत असून सत्ता असो नसो त्यांचे नाते कायम राहिले आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षकांच्या अपेक्षा अधिक आहेत. येत्या 15 दिवसांत शिक्षण व शिक्षकांच्या प्रश्‍नासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, नगरविकासमंत्र्यांची बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेऊ. महाविकास आघाडी सरकार शिक्षकांना रिकाम्या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रविवारी दिली.

फेब्रुवारी महिन्यात शिक्षक संघाच्या होणार्‍या राज्य अधिवेशनास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री उपस्थित राहतील. याप्रसंगी सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू तीन-चार आठवड्यात शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी बैठक होईल असे देखील पवार बोलताना म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यस्तरीय महामंडळ सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

बदली धोरणांबाबत लवकरच विशेष परिपत्रक : मुश्रीफ
सर्वसमावेशक बदली धोरण तयार करण्यासाठी विशेष परिपत्रक काढण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. नवीन सचिव आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच इतर मागण्यांसाठी पंधरा दिवसांमध्ये संबंधित मंत्र्यांची बैठक देखील बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील अनेक प्राथमिक शाळांना वर्ग खोल्या नसून बहुतांश प्राथमिक शाळांची दुरावस्था झाली आहे. अशा अनेक गोष्टींनी राज्याला ग्रासले आहे. भाजप सरकारने केवळ बुलेट ट्रेन व मेट्रोला प्राधान्य दिले. ग्रामीण भागात सुविधा पुरवणे, प्राथमिक शिक्षण बळकट करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. यामुळे छोटे प्रश्‍न गंभीर स्वरूपाचे बनले आहेत, असा टोला ग्रामविकामंत्री मुश्रीफ यांनी भाजपला लगावला.

विद्यार्थी घडवण्यासाठी नवनवीन प्रयत्न – थोरात
प्राथमिक शिक्षक आज मनापासून काम करीत असून त्यांच्यात चैतन्य दिसत आहे. नवी पिढी घडविताना ते वेगळ्या विचाराने पुढे जाताना दिसत आहेत. ग्रामीण विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक नवीन प्रयोग करीत आहेत. शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी आपली नेहमीच साथ राहील. असे आश्वासन देखील थोरात यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमासाठी संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आभार मानले. यावेळी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, पालकमंत्री सतेज पाटील, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like