PM मोदी, HM शहांच्या सभांचं ते विजयाचं मॅजिक चाललंच नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा, रोडशोमुळे भाजपा व तेथील उमेदवारांना आपला विजय निश्चित झाल्याचे वाटत होते. २०१४ व २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता. पण यंदा मोदी आणि अमित शहा यांच्या सभा व रोड शोचे विजयात रुपांतर होताना दिसून आले नाही.

महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अमित शहा यांनी केला होता. तर, नरेंद्र मोदी यांनीही परळीमध्ये सभा घेतली होती. तरीही पंकजा मुंडे यांचा पराभव ते रोखु शकले नाही. तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश अमित शहा यांच्या घरी झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी खास त्यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. तरीही साताऱ्यात उदयनराजे यांच्या पराभवाने राज्यभर खळबळ उडाली. विदर्भातील ६२ पैकी २९ जागा भाजपाला ४ जागा शिवसेनेला मिळाल्या. आघाडीने मात्र जास्तीच्या १० जागा मिळविल्या. राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या.

नरेंद्र मोदी यांच्या अकोल्यातील सभेने भाजपाच्या दोन उमेदवारांना फायदेशीर ठरल्या. मात्र साकोलीतील त्यांची सभा राज्यमंत्री परिणय फुके यांचा पराभव टाळू शकली नाही. मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांंनी नांदेड, परतूर, परळी, औसा येथे सभा घेतल्या. मात्र, मतदारांवर या सभांचा फारसा प्रभाव पडला नाही.

नरेंद्र मोदी यांनी मुंबईत वांद्रे पूर्व मध्ये सभा घेतली होती. तेथे बंडखोरीमुळे शिवसेनेचा पराभव झाला.
जळगावात झालेल्या मोदी यांच्या सभेचा परिणाम झाला नाही. भाजपाच्या जिल्ह्यातील दोन जागा कमी झाल्या. त्याचवेळी धुळे, नंदुरबारात सभा न होताही संख्याबळ कायम राहिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. यंदा आठपैकी २ जागा भाजपाने गमाविल्या. अमित शहा कोल्हापूर, जत, कऱ्हाड येथे सभा होऊनही उमेदवारांचा पराभव झाला. शिरुरमध्ये अमित शहा यांनी रोड शो केला. परंतु, तेथे भाजपाचा पराभव झाला.

Visit : Policenama.com