‘मेगा भरती ही मेगा चूक’ असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा ‘यु टर्न’, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगा भरती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून आता यु टर्न घेतला आहे. मेगा भरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली. मेगा भरती ही मेगा चूक होती असं वक्तव्य काल चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. यावरून त्यांनी आता यु टर्न घेतला आहे. भाजपमध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचा आम्हाला फायदाच झाला. मी काल जे काही बोललो त्याचा विपर्यास केला गेला” असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण…

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपमध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला फायदाच झाला. भाजप कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आमची पार्टी कोणाचीही मालकी होऊ शकत नाही. ती कार्यकर्त्यांच्या मालकीची आहे. कालच्या आकुर्डीतल्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माध्यमांनी बातमी दाखवण्याआधी पडताळणी करावी. जुन्यांना डावलले असे नाही. 27 तिकीटं ही नव्या लोकांना देण्यात आली आहेत. भाजपमध्ये मेगा भरतीचा निर्णय कोर कमिटीचा होता. माझ्या एकट्याचा नव्हता.”

काल चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

काल आकुर्डीतील बैठकीत बोलताना मात्र भाजपमधील मेगा भरती ही मेगा चूक होती असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. ते म्हणाले होते, “हा माझा, हा तुझा यामुळे भाजपचं नुकसान झालं. दिल के नजदीक है याला महत्त्व नसून पार्टी के नजदीक है याला महत्त्व द्यायला हवं. मेगा भरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती.” असं ते म्हणाले होते.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/