लॉकडाऊनमध्ये ‘या’ बडया कंपन्यांमध्ये मेगाभरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगावर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. त्यात जगभरात आतापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याच दरम्यान ई-कॉमर्स कंपनी जसे अॅमेझॉन, ग्रॉफर्स, पेटीएम मॉलकडून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जात आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन सेवेचा वापर वाढल्याने ई-कॉमर्स कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे दिसत आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन आहे. याच दरम्यान, अनेकांनी ऑनलाईनचा पर्याय निवडून अत्यावश्यक वस्तू ऑनलाईन मागवल्या. त्यामुळे इंटरनेट व्यवसायाला याचा मोठा फायदा झाला असून मनुष्यबळ वाढवण्यासाठी या कंपन्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अॅमेझॉन कंपनीत 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे. कुठल्याही व्यत्ययाविना ग्राहकांना सेवा देण्यासाठी आधीच तयारी करण्यात येत आहे. असे अॅमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना, ई-ग्रॉसरी सेगमेंटमधील बिग बास्केट आणि ग्रॉफर्स, पेटीएम मॉल, फायनान्शियल टेक्नोलॉजी कॅटेगिरीमधील भारत-पे, ऑनलाईन मांसाहारीसाठी लिशिप्स, ऑनलाइन रिअल इस्टेट कॅटेगिरी नोब्रोकर. कॉम, लॉजिस्टिक कॅटेगिरीमध्ये ईकॉम एक्सप्रेस यांनी नुकतेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. वाढत्या ग्राहकांच्या मागणीनुसार इंटरनेट कंपन्यांमध्ये पुढील महिन्यात आणखी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे.