बेरोजगारांसाठी खुशखबर ! मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुबई महानगर पालिकेत लवकरच कार्यकारी सहाय्यक पदासाठी मेगा भरती केली जाणार आहे. ८१० रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेऊन ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पदासाठी सुमारे एक लाखाहून अधिक अर्ज येण्याची शक्यता आहे. महाऑनलाइन लिमिटेड या कंपनीद्वारे ही भरती पार पडणार आहे.

कंपनीच्या माध्यमातून पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणक ज्ञानाची परीक्षा आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यकारी साहाय्यक वर्गासाठी (लिपिक) एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरण्यात येणार आहेत़ त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली ८१० पदे लवकरच भरण्यात येणार आहेत.

असा दाखल करा अर्ज
अर्जाचा निमून महाऑनलाइनच्या महा रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर टाकला जाणार आहे. याची लिंक देखील महानगर पालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर अधिकृत पद्धतीने घोषणा करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

राज्य शासनाच्या संस्थांची माघार
राज्य सरकारच्या महाआयटी आणि आयबीपीएस या नामांकित संस्थांनी इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाआॅनलाइन लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबवणार असल्यामुळे जाहिरातीद्वारे निविदा मागवणे ही प्रक्रिया शिथिल करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी शुल्क
महानगर पालिकेच्या भरतीसाठी होणाऱ्या या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ९०० रुपये तर मागासवर्गीय व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ७०० रुपये शुल्क घेतले जाणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –