Amol Kolhe : खासदाराचं काम दिल्लीत गर्जायचं असतं, गल्लीत बोंबलत फिरायचं नसतं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टीकाकारांचं लक्ष नव्हतं म्हणून त्यांना समजलं नसेल की कोरोना महामारीच्या काळात नेमकं कोणतं काम करायचं असतं? मला तर अवघ्या वर्षात एवढं समजलं की खासदाराचं काम गल्लीत बोंबलत फिरायचं नसतं, तर दिल्लीत गर्जायचं असतं, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा आज परखड समाचार घेतला.

बेल्हे ते शिरूर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 761) रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार कोल्हे म्हणाले, टीका करणार्‍यांबाबत आम्ही काहीच बोलत नाही. कारण, आम्ही शेतकर्‍यांची पोरं आहोत, आम्हाला माहीत आहे की बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारत नाहीत, मारली तर आंब्याच्या झाडाला मारतात.

खासदार कोल्हे म्हणाले, कोरोना काळातील गोष्टी सांगतो, सुरुवातीला फॅबिफ्लू नावाची गोळी आली. कोविडच्या रुग्णाला अ‍ॅडमिट केल्यानंतर त्यांना ती गोळी दिली जाते. सुरुवातीला या गोळीची किंमत होती 130 रुपये होती. पहिल्या दिवशी 24 गोळ्या घ्यावा लागतात, तर दुसर्‍या दिवशी 18 गोळ्या घ्याव्या लागतात. शिरूरच्या या खासदाराने आवाज उठवल्याने औषध कंपनीने माघार घेतली आणि गोळीची किंमत 75 रुपये केली. या कामासाठी आयसीएमआर, केंद्रीय आरोग्य मंत्रालय इत्यादी ठिकाणी पाठपुरावा केला.

शिवाय, अ‍ॅक्बेरा इंजेक्शनचा वापर करावा की नाही, यासंदर्भात झालेला बदल सुद्धा मी केलेल्या पाठपुराव्याने झाला आहे. रेमिडीसिव्हर औषधाचा अतिरेक वापर थांबावा, यासाठी मी प्रयत्न केले. आता हे काम नेमके कुणाचा आणि काय असते ते तुम्हीचा सांगा. जुन्नर तालुक्यात सर्वप्रथम लेण्याद्रीत कोविड केअर सेंटर उभारले गेले. तेव्हा कोविड सेंटरची गरज काय, असे काहीजण म्हणत होते. परंतु लोकप्रतिनिधी सुशिक्षित असल्याने असा फायदा होतो.

त्यानंतर ओझरमध्ये सुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यात आले. शिवाय या भागात कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली. या सुविधा प्रथम शिरूर लोकसभा मतदारसंघात देण्यात आल्या. खासदाराचे काम हे देशाची पॉलिसी ठरवण्याचे आणि त्याबाबत विचार करण्याचे असते, असे म्हणत खासदार कोल्हे यांनी मतदार संघातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगला टोला हाणला.