Coronavirus : नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्लाझ्मा घेऊन चालले होते, पण…

पोलिसनामा ऑनलाईन – नवजात मुलीचा जीव वाचवण्यासाठी ब्लड प्लाझ्मा घेऊन जाणारे एकाच कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले आहेत. वेगवान कारने त्यांच्या कारला दिलेल्या धडकेत तिघे जखमी झाले. दिल्लीमधील टिळक मार्गावरील भगवान दास रोडवर हा अपघात झाला. 11 जुलै रोजी हा अपघात झाला. कुटुंबाचा अपघात झाल्याने बाळाला वेळेवर ब्लड प्लाझ्मा मिळू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी 27 वर्षीय कारचालक शाह वेद शेख याला अटक केली आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. अपघातात शक्ती सिंग, त्यांची पत्नी पुष्पा राणी आणि बहिण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ब्लड प्लाझ्मा शक्ती सिंग यांच्या भावाच्या नवजात मुलीसाठी हवे होते. 4 जुलै रोजी जन्मलेल्या चिमुरीडवर तात्काळ उपचार करणे आवश्यक होते. कुटुंबीय इंडियन रेड क्रॉस सोसायटी येथून ब्लड प्लाझ्मा घेऊन रुग्णालयात चालले होते. याचवेळी रस्त्यात त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडी पलटी झाली. ब्लड प्लाझ्माचंही नुकसान झाले. त्यामुळे चिमुरडीला वेळेत ब्लड प्लाझ्मा मिळू शकला नसल्याचे तिचा मृत्यू झाला.