शिवस्मारकाचे काम आजपासून प्रत्यक्ष सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्राचे दैवत आणि प्रेरणास्थान असलेल्या शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि बहुचर्चित असणाऱ्या  बहुचर्चित असणाऱ्या  शिवस्मारकाचं बांधकाम आजपासून सुरु होणार आहे.  एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून आज प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. आज दुपारी ३ वाजता शिवस्मारकाच्या पायाभरणीचं काम सुरु होणार आहे.पुढच्या ३६ महिन्यांत हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. अरबी समुद्रातील हे स्मारक जगातील सर्वोच्च स्मारक असणार आहे.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक उभारण्यासाठी सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. आघाडीच्या सरकारच्या काळात हे  स्मारक घोषित झाले होते. अरबी समुद्रात १५ हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे अडीच हजार कोटी रुपये नि‌श्चित केला आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागतिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात एल अॅन्ड टी, रिलायन्स ‌इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यानी ‌निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात एल अॅन्ड टी या कंपनीची निविदा ही सर्वात कमी किमतीची असल्यामुळे या कंपनीला स्मारक उभारण्याचे काम सोपविले आहे.

अशी असेल शिवस्मारकाची रचना

या स्मारकातील मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार बनवणार आहेत.  पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी १८० मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात १६ एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे ३०९ फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे. स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस १.२  कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने ३. ६० कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस २.६०  कि.मी अंतरावर आहे. स्मारकासाठी १५. ९६ हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे ६५० मी ३२५ मी. एवढे आहे. सभोवताली १७. ६७ हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.

महाराजांची माहिती आणि देखावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचं जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

पर्यटकांनी या स्मारकाच्या परिसरात प्रवेश करताच त्यांना तुळजाभवानी मातेचे दर्शन मिळणार आहे. यासाठी तुळजापूरच्या मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या क्षेत्रा पुढे जलदुर्गासारखी दगडाची तटबंदी साकारली जाणार आहे.स्मारकामध्ये महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट दाखवला जाणार आहे. स्मारकामध्ये दररोज दोन वेळा दोनशे कलाकारांच्या माध्यमातून राजेंच्या राज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्यात येणार आहे. सोबत थ्री डी आणि फोर डीच्या लाईट व साऊंड यांचे शो बघायला मिळणार आहे.

स्मारकात महाराजांच्या विषयीचे ग्रंथ संग्रहालय, कला संग्रहालय हे उभारण्यात येणार आहेत. मत्स्यालय, ऑडीटोरीअम, विस्तीर्ण बाग बगिचे, आयमॅक्स सिनेमागृह यांचे निर्माण केले जाणार आहे. या भव्य आणि दिव्य पुतळ्याचे मनमोहक रूप हे अॅम्पिथिएटर मध्ये बसून अनुभवता येणार आहे.