महिलेनं ‘मासिक पाळी’त स्वयंपाक केल्यास पुढचा जन्म ‘कुत्री’चा, जेवण करणारा पुरूष बनणार ‘बैल’ : स्वामी कृष्णस्वरूप

राजकोट : वृत्तसंस्था – मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलांबद्दल भूजमधल्या स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मासिक पाळीच्या काळात एखाद्या महिलेनं पतासीठी स्वयंपाक केल्यास तिचा पुढचा जन्म कुत्रीचा मिळेल. तर अशा महिलांच्या हातचं खाणारा पुरुष पुढल्या जन्मा बैल होईल असे वक्तव्य कृष्णस्वरुप यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

स्वामी कृष्णस्वरुप दासजी भूजमधील नारायणस्वामी मंदिराचे उपदेशक आहेत. त्यांनी त्यांच्या अनुयायांना गुजराती भाषेत संबोधित केले. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलेनं स्वयंपाक केल्यास ती पुढल्या जन्मी कुत्री होईल. तर अशा महिलेच्या हातचे जेवण करणारा पुढील जन्मी बैल होईल असे प्रवचनादरम्यान त्यांनी म्हटले असल्याचे वृत्त गुजरातमधील एका वृत्तपत्राने दिलं आहे.

प्रवचनादरम्यान त्यांनी पुरुषांना आवाहन केले आहे की, मासिक पाळी आलेल्या महिलांनी तयार केलेले अन्न खाण्याचे टाळा. जर अशा महिलेच्या हातचे तुम्ही जेवण करत असाल तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहेत. कारण शास्त्रात याबद्दल अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नाच्या आधिपासूनच या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी यापूर्वी तुम्हाला कधी याबद्दल सांगितले की नाही हे मला माहित नाही. मी 10 वर्षापासून अशा प्रकारचा सल्ला देत आहे. आपल्या धर्मातील काही गोष्टीबद्दल बोलू नका असे काही संत सांगत आहेत. मात्र, मी तुम्हाला सांगितले नाही तर तुम्हाला समजणार कसे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रवचनाचा व्हिडिओसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी स्वामीनारयण भूज मंदिराचे विश्वस्त यादवजी गोरसिया यांना स्वामी कृष्णस्वरुप यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.