बुटावर ‘ठाकूर’ नावाचा उल्लेख, दुकानदार पोलिसांच्या ताब्यात, बूट बनविणार्‍या कंपनीवर कारवाईची मागणी

लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन –   ठाकूर (Thakur) नावाच्या ब्रँडचे बूट विकल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका शूज विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. बुलंद शहरातील गुलावठी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दुकानदार आणि बूट बनविणा-या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते विशाल चौहान यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. बुटाच्या सोलवर ठाकूर या नावाचा उल्लेख असल्याचे विशाल यांनी पाहिले होते. त्यानंतर, यातून जातीवाचक भावना दुखावल्या जात असल्याचे सांगत त्यास विरोध केला आहे. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुकानाबाहेर गर्दी केली होती.

दुकानदार मोहम्मद नासीर यांनी दुकानाबाहेर जमा झालेल्या नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. ठाकूर हा बुट विक्रीचा ब्रँड असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चौहान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामध्ये, दुकानदार आणि बूट बनविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून बजरंग दल कार्यकर्ते आणि दुकानदार यांच्यात शाब्दीक वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.