मोहननगर येथून व्यापारी कुटुंबासह बेपत्ता

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज मुदतीत फेडता न आल्याने कंटाळून मोहननगर, चिंचवड येथून एक व्यावसायिक कुटुंब राहत्या घरातून बेपत्ता झाले आहे.

संतोष एकनाथ शिंदे (४७), पत्नी सविता संतोष शिंदे (४१), मुलगा मुकुंद शिंदे (२२), मैथली शिंदे (१८, सर्व रा. क्रांती ज्योती शाळेजवळ, मोहननगर, चिंचवड) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन एकनाथ शिंदे (३८) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी व्यवसाय व इतर कामांसाठी विविध ठिकाणाहून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी मागील काही दिवसांपासून खासगी पतसंस्था आणि अन्य कर्जदारांचे पैसे परत मागण्यासाठी फोन येत होते. वेळेत कर्ज फेडता येत नसल्याने ते मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होते. यातच ५ डिसेंबर रोजी संतोष शिंदे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह घरातून निघून गेले.  त्यानंतर त्यांचे कुटुंबीय बेपत्ता झाले. रात्री उशीर झाला तरी शिंदे कुटुंबीय घरी आले नाहीत.

त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. घरच्यांनी एकनाथ शिंदे राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना चौघांचे मोबाईल फोन मिळाले. तसेच एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये शिंदे यांनी लिहले होते की, “माझ्या साऱ्या व्यवहराचा तपशील डायरीत लिहून ठेवला आहे. मी माझा परिवार आत्महत्या करत आहोत.” चिठ्ठी शेजारीच घरातील कपाटाच्या चाव्याही ठेवल्या होत्या. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.