कुटुंबाला 1 कोटीच्या विम्याची रक्कम मिळावी म्हणून व्यापार्‍यानं 90 हजारात करून घेतली स्वत: चीच हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : व्यवसायात नुकसान झाल्यानंतर जेव्हा कुटुंबाच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली, तेव्हा व्यावसायिकाने आपली पत्नी व मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी 90 हजारांत आपला बळी दिला. यामागचा हेतू असा होता की, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 1 कोटी विम्याची रक्कम मिळेल. हे धक्कादायक प्रकरण दिल्लीतील आहे, जेथे व्यवसायाच्या तोट्यातून त्रस्त असलेल्या उद्योजक गौरव बन्सल यांनी कुटुंबाला आर्थिक अडचणीतून वाचवण्यासाठी स्वत: चा जीव दिला.

गौरवने विम्याचे एका कोटी रुपये कुटुंबाला मिळवून देण्यासाठी फेसबुकवर आपल्या एका अल्पवयीन मित्राला आपल्या हत्येचे कंत्राट दिले होते. या मित्राने इतर तीन जणांच्या मदतीने गळ्याला दोरी घालून गौरवला झाडावर टांगले. या अल्पवयीन मुलाची चौकशी करून पोलिसांनी अन्य आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल.

दरम्यान, बाह्य जिल्हा पोलिस उपायुक्त डॉ. ए कौन यांनी सांगितले की, दहा जून रोजी रणहौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बापरौला विहारजवळ एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळला होता. आयपी एक्सटेंशन येथे असलेल्या आर्य नगर अपार्टमेंटमधील रहिवासी गौरव बन्सल असे मृतदेहाचे नाव आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर, निरीक्षक शाही राम यांच्या नेतृत्वात तपास पथक तयार करण्यात आले, ज्यांनी गौरवच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. या दरम्यान, 9 जून रोजी आनंद विहार पोलिस ठाण्यात त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. यानंतर तांत्रिक देखरेख व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम सूरज नावाच्या व्यक्तीला पकडले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, एका अल्पवयीनच्या सांगण्यावरून सुमित कुमार आणि मनोजकुमार यादव यांच्या मदतीने त्याने ही हत्या केली.

गौरवने एका अल्पवयीनसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली. त्यानेच गौरव कडून सुपारी घेत मित्र मनोजसोबत हत्येचा कट रचला. मनोजने सुमित आणि सूरजचाही यात समावेश केला. गौरवने या लोकांना सांगितले होते की, त्याचा एक कोटीहून अधिक विमा आहे, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबातील सदस्यांना ही रक्कम मिळेल. यामुळे कुटुंबाची आर्थिक अडचण दूर होईल. सुपारीची रक्कम गौरवने आरोपीला आधीच दिली होती, पोलिस आरोपींकडून त्या रकमेबाबत विचारपूस करत आहेत.