पाच रुपयात 30 किमी धावते मेश्राम गुरुजींची बॅटरीवरील सायकल

गोंदिया : वृत्तसंस्था

सतत पेट्रोलच्या वाढत्या किंमती, दिवसेदिवस प्रदुषनात होणारी वाढ यावर गोंदियातील एका शिक्षकाने भन्नाट उपाय शोधत अनोखी सायकल तयार केली आहे. फक्त 5 रुपयात ही सायकल 30 किमीचा प्रवास करते. त्यामुळे बॅटरीवर चालणारी ही सायकल परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

सायकल म्हणजे पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहन. मेश्राम गुरुजींनी केवल 13 हजार रुपयात पर्यावरणाचा ऱ्हास टाळणाऱ्या या पर्यावरण पुरक सायकलची निर्मिती केली आहे. सयकलला गती मिळण्यासाठी तिला 12 व्हॅटच्या दोन बॅटऱ्या बसवल्या आहेत. ही सायकल 10 हजारात उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मेश्राम गुरुजींकडे स्वतःची दुचाकी-चारचाकी असूनही आपल्या निलज गावातून डांगोर्लीच्या शाळेपर्यंतचा प्रवास या सायकलवरुनच करतात. मेश्राम गुरुजींच्या सायकलीचा आदर्श ग्रामस्थांनीही घेतला आहे. आता पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांऐवजी अशा पर्यावरणपूरक वाहनांनी प्रवास केला तर सर्वात आधी आपल्या खिशातल्या पैशाची बचत तर होईलच, शिवाय प्रदुषणात होणारी वाढ थांबेल. या भन्नाट उपक्रमामुळे गुरुजींचे सर्व स्तरातून काैतूक होत आहे.