Pune : पदवीधर, शिक्षक मतदार याद्यांमध्ये गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ( Pune Graduate Constituency ) उमेदवारी अर्ज भरण्यास एक दिवस शिल्लक राहिला आहे. मात्र, मतदारसंघाच्या मतदार याद्यांमध्ये (voter list) गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मतदारांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती नसतानाही ऑनलाइन आलेले हजारो अर्ज मंजूर केल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव ( Divisional commissioner Saurabh Rao)यांनी मतदारांच्या साक्षांकित प्रती नसल्यास संबंधित मतदारांचे अर्ज नामंजूर करा, असे आदेश विभागातील पाचही जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी मतदार संख्या वाढवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. पदवीधर मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कागदपत्रे घेऊन ती कागदपत्रे ऑनलाइन अर्जासोबत सादर केले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कागदपत्रे साक्षांकित असणे गरजेचे आहे. मात्र, कागदपत्रे साक्षांकित न करता हे अर्ज मंजूर झाल्याची तक्रार प्रजासत्ताक भारत पक्षाचे लक्ष्मण चव्हाण यांनी विभागीय आयुक्त राव यांच्याकडे केली होती. त्यानुसार राव यांनी मतदारांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती नसल्यास ते अर्ज नामंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पदवीधर मतदारसंघासाठी मतदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी मतदार 2016 पर्यंत पदवीधर असणे आवश्यक आहे. मात्र, 2019 मध्ये पदवीधर झालेल्यांचीही नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कागदपत्रे साक्षांकित नसलेले दोन लाख मतदार आहेत. त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. याप्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आलेल्या मतदारांच्या अर्जाची छाननी करून त्यांची नावे पुरवणी मतदार यादीमध्ये समाविष्ट केली जातात. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदारांचे अर्ज ऑनलाइन भरण्यावर भर दिला आहे. राव यांच्या आदेशानंतर या अर्जाची छाननी सुरू केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देण्यास उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी नकार दिला.

– पदवीधर मतदारसंघासाठी 5 नोव्हेंबपर्यंत 5 लाख 25 हजार 856 मतदारांची नोंदणी
– पुणे जिल्ह्यातील 85 हजार 600 मतदार
– हजारोंच्या संख्येने मतदारांचे ऑनलाइन अर्ज दाखल
– अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेला विलंबाची शक्यता