हवामानाबरोबरच IMD वर्तवणार मलेरियाचा अंदाज !

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन – हवामान खात्याने (आयएमडी) उच्च दक्षता कम्प्युटिंग (एचपीसी) क्षमता वाढवली आहे. त्यामुळे हवामानाचा उल्लेखनीय अंदाज वर्तवण्यात आणखी मदत मिळणार आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आजारांबाबतही आता आयएमडी अंदाज वर्तवू शकते अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी दिली.

भारतीय विज्ञान अकादमीने शनिवारी आयोजित केलेल्या हवामान व जलवायू पूर्वानुमानात झालेली प्रगती या विषयावरील संमेलनात राजीवन बोलत होते ते म्हणाले, उच्च दक्षता कम्प्युटिंग (एचपीसी) क्षमता सध्याच्या १० पेटा फ्लॉप्सपासून वाढवून ४० पेटाफ्लॉप्स करण्याची योजना आहे. सध्या एचपीसीबाबत अमेरिका, ब्रिटन व जपाननंतर भारताचे स्थान आहे.
व्हेक्टर जनित (डास आदीपासून फैलावणारे आजार) आजारांचा अंदाज वर्तविण्यासाठी आयएमडीने मलेरिया होण्याचा पावसाळ्याशी असलेला संबंध याबाबत अभ्यास केला आहे. आयएमडीने सर्वांत प्रथम नागपूरहून येणाऱ्या आकड्यांचा अभ्यास केला. यामुळे मलेरियाचा अंदाज व्यापक प्रमाणावर लागू करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर डेंग्यू व इतर आजारांचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जाईल.

पुढील वर्षी सुरु होणार सेवा
जागतिक मलेरिया अहवाल-२०१९नुसार जगभरातील ८५ टक्के मलेरियाचे रुग्ण भारतात आढळतात. पूर्व व मध्य भारतात मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात तसेच जंगल, पर्वत रंग आणि आदिवासी भागांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पुढील वर्षी पासून आयएमडी मान्सूनमधील मलेरियाचा अंदाज वर्तविण्याची सेवा सुरू करणार आहे.