#MeToo : लव रंजनच्या चित्रपटाला रणबीरचा रामराम 

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप #MeToo च्या मोहिमे अंतर्गत केले, आणि #MeToo  चे वादळ अख्ख्या बॉलिवूड मध्ये फोफावत गेले. त्यानंतर अलोक नाथ,साजिद खान  यांच्यावर देखील आरोप झाले. पण या #MeTooच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तींच्या करिअरला मात्र कात्री लागल्याचे पाहायला मिळत आहे. आता ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाचा दिग्दर्शक लव रंजनवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर अभिनेता रणबीर कपूरनं त्याच्या चित्रपटातून अंग काढून घेतलं आहे.
लव रंजनच्या आगामी चित्रपटासाठी रणबीर कपूर आणि अजय देवगण यांची निवड करण्यात आली होती. मात्र, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याआधीच लव रंजनवर एका महिलेनं लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. म्हणूनच रणबीर कपूरनं चित्रपटातून काढता पाय घेतला असल्याचं समजतंय. तर, एकीकडे चित्रपटाची कथा रणबीरला न आवडल्यानं त्यानं हा चित्रपट सोडला असल्याचंही बोललं जातंय.
लव रंजनच्या चित्रपटाची कथा वाचल्यानंतर रणबीरनं त्याला कथेत काही बदल सुचवले होते. पण तत्पूर्वीच लव रंजनवर झालेल्या आरोपांमुळं रणबीरनं चित्रपटच सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
#MeToo च्या  मुद्द्यावर आमीरने सोडला चित्रपट
 दुसरीकडे लैंगिक शोषणाच्या  शिकार ठरलेल्या महिलांच्या सपोर्टमध्ये आमीर खान देखील समोर आला आहे. त्यासाठी त्याने गुलशन कुमार यांच्यावरील बायोपिक ‘मुगल’ सोडला आहे. आमिरने ट्वीट केले की, इंडस्ट्रीशी संबंधित असल्याने सामाजिक मुद्द्यांचा विचार करणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा #MeToo कॅम्पेनबाबत अनेक वक्तव्ये आली तेव्हा आम्ही ज्यांच्याबरोबर काम करणार होतो, त्यांचे नावही अशाच प्रकरणात आले आहे. या प्रकरणी चौकशी केली तेव्हा कोर्टात प्रकरण सुरू असल्याचे समजले. त्यामुळे त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला. चित्रपटसृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते. असे आमिरने ट्विट द्वारे सांगितले .
आपल्या इंडस्ट्रीमध्ये अनेक महिला शोषणाच्या शिकार ठरल्या आहेत. पण ही इंडस्ट्री सुरक्षित बनवणे आपली जबाबदारी आहे. आमिरने जो चित्रपट सोडला आहे, त्यात तो अॅक्टींगबरोबरच निर्मिती बरोबरच निर्माता म्हणूनही सहभागी होणार होता.
 चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार होते. त्यांच्यावर चार वर्षांपूर्वी गितिका त्यागी नावाच्या मॉडेल आणि अॅक्ट्रेसने लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना अटकही झाली होती, पण नंतर त्यांना जामीन मिळाला. सुत्रांच्या माहितीनुसार, आमीरच्या स्टेटमेंटनंतर भूषण कुमार यांनी सुभाषला चित्रपट सोडण्यास सांगितले आहे.