#MeToo: भारतात महिलांचा आदर करण्याचं प्रमाण कमीच – पी.व्ही.सिंधु

हैद्राबाद :वृत्तसंस्था- हैदराबादमध्ये पोलिसांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला जगप्रसिद्ध बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात MeToo मोहिमेबद्दल बोलतांना आपल्या देशात महिलांचा आदर करण्याचं प्रमाण कमीच असल्याची खंत तिने बोलून दाखवली. आपल्या देशात महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे तो बदलण्याची गरज आहे असंही सिंधूने बोलून दाखवलं आहे. आपल्या देशाच्या तुलनेत इतर देशांमध्ये महिलांचा आदर मोठ्या प्रमाणावर केला जातो असंही ती यावेळी म्हणाली.

मी जेव्हा देशाबाहेर खेळायला जाते तेव्हा मला त्या देशांमध्ये  महिलांबाबतचा आदर पाहण्यास मिळतो, अनुभवता येतो. भारतात अनेकजण फक्त असे म्हणतात की, महिलांचा सन्मान केला पाहिजे, त्यांचा आदर राखला पाहिजे परंतु प्रत्यक्षात मात्र ही कृती अत्यंत कमी प्रमाणात घडते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे अशी खंत सिंधूने बोलून दाखवली.

महिलांनी अबला नाही तर सबला झाली पाहिजे. स्वतःवरचा विश्वास महिलांनी कधीही ढळू देऊ नये. जर महिलांवर अन्याय झाला, त्यांचं शोषण झालं तर त्यांनी त्यावर बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. कोणीही तुम्हाला मागास समजणार नाही. उलट आवाज उठवलात तर लोक मदतच करतील असंही मत सिंधूने व्यक्त केलं. या कार्यक्रमात सिंधूला MeToo मोहिमेविषयी प्रश्न  विचारण्यात आले होते. त्यावर तिने हे उत्तर दिले.

Loading...
You might also like