#MeToo: साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक साजिद खानवर मी टू मोहिमेंतर्गत यापूर्वीच दोन अभिनेत्रींनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता आणखी एका अभिनेत्रीने साजिद खानवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ऑडिशनदरम्यान साजिद खानने बिकिनी घालायला सांगून सोफ्यावर अश्लील चाळे केले, असा अस गंभीर आरोप अभिनेत्री प्रियंका बोसने केला आहे. यामुळे मी टूचा चांगलाच दणका साजिद खानला बसल्याचे दिसून येत आहे.

प्रियंका बोसने मिस मालिनी डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे गंभीर आरोप केले आहेत. या मुलाखतीमध्ये प्रियंकाने म्हटले की, साजिद खानने मला ऑडिशनसाठी बोलावले होते. साजिदच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा मला मेसेज आला होता की बिकीनीमध्ये ऑडिशन द्यावे लागणार आहे. मी ऑडिशनला गेल्यावर बिकीनी घालून आले. साजिद काही वेळाने तिथे आला. तो सोफ्यावर बसला आणि माझ्यासमोरच अश्लील चाळे करु लागला. तो म्हणाला, तुला पाहून मी उत्तेजित होत नाही. मग प्रेक्षक कसे उत्तेजित होतील. साजिदचे ते वर्तून पाहून मी रडतच तिथून निघाले आणि घर गाठले, असे प्रियंकाने म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये प्रियंका बोसने दिग्दर्शक सौमिक सेनवरही प्रियंकाने आरोप केला आहे. सौमिक सेनने मला तुझ्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवायचे आहे, असे प्रियंकाने सांगितले. अभिनेत्री प्रियंका बोसचा लायन हा हॉलीवूडमधील चित्रपट गाजला होता.

ऑस्करमध्ये या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. दरम्यान, साजिद खानवर याअगोदरही लैंगिक छळाचे आरोप झाले असून करिश्मा उपाध्याय आणि अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे साजिदला हाऊसफुल ४ हा चित्रपट सोडावा लागला होता. अक्षय कुमारनेही साजिद खानसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता.