नागपूरबरोबर पुण्याची मेट्रो सुरू झाली नाही सत्ताधाऱ्यांचे हे अपयशच : माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाला पुणेकरांनी भरभरून यश दिले पण या पक्षाने सातत्याने पुण्याला सापत्नभावाची वागणूक दिली. पुणे आणि नागपूर मेट्रोची घोषणा एकाच वेळी झाली; नागपूरची मेट्रो धावू लागली पुण्याच्या मेट्रोच्या वाट्याला विलंबच आला. पुण्यातल्या खासदार आणि आठ आमदारांचे हे अपयशच आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणेकरांनी भाजपचे आठ आमदार आणि एक खासदार भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून पुण्याला सापत्नभावाची वागणूक देण्यात आली. या विरोधात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अवाक्षर काढले नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे, नागपूर मेट्रोची घोषणा एकाच वेळी केली. पण त्यानंतर सत्तेवर आलेल्या नेत्यांनी नागपूरच्या मेट्रोला चालना दिली, पुण्यातले भाजपचे खासदार आणि आमदार एकमेकांत वाद घालत बसले. सापत्न भाव आणि वादावादी याचा परिणाम पुण्याच्या मेट्रो कामावर झाला, कामाला विलंब झाला. पुणे आणि नागपूर प्रकल्प एकत्र राबविण्यासाठी महामेट्रोची स्थापना झाली खरी पण पुण्याचे भाजप आणि शिवसेनेचे नेते सपशेल अपयशी ठरले. मेट्रोच्या कामाचा दिखावूपणा करून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, अशी टीका जोशी यांनी केली आहे.

पुण्याची मेट्रो लवकरच धावताना दिसेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे उदघाटन करताना केली. त्या दृष्टीने कोणतीही तयारी दिसत नाही. मेट्रो मार्गाला कसबा पेठ आणि कल्याणी नगर अशा दोन ठिकाणी विरोध होतो आहे. तेथील रहिवाशांसाठी समाधानकारक तोडगा काढून काम मार्गी लावण्यातही भाजप नेत्यांना जमलेले नाही, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.