केरळमध्ये भाजपकडून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांची केरळच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून भाजपने नियुक्ती केली आहे. ई. श्रीधरन यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यांची लोकप्रियता पक्षासाठी केरळ निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. केरळमधील भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून येथील प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी ई.श्रीधरन यांच्या नावाची घोषणा केली.

केरळ मध्ये विधानसभेच्या सर्व जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. केरळमधील 14 जिल्ह्यातील 140 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे केरळमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

कोण आहेत ई.श्रीधरन ?

ई.श्रीधरन हे भारतातील प्रसिद्ध सिव्हिल इंजीनिअर असून ते 88 वर्षांचे आहेत. 1995 ते 2012 या कालावधीत ते दिल्ली मेट्रोचे संचालक होते. दिल्लीत मेट्रोची योजना यशस्वी अंमलात आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. याशिवाय त्यांचे कोलकाता मेट्रो, कोचीन मेट्रो तसेच देशात विविध ठिकाणी राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पात मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाते. 2001 मध्ये त्यांचा पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

श्रीधरन मोदी समर्थक

2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी ई श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, मोदी देशातील सर्वात योग्य लीडर्सपैकी एक आहेत. त्यांच्या हातून देशाचं भविष्य उत्तम होऊ शकतं.