Pune News : वनाज-गरवारे मेट्रोची ट्रायल रन 2 महिन्यांत घेणार : डॉ. ब्रिजेश दीक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी- चिंचवड पाठोपाठ वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या सुमारे 3.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रोची चाचणी (ट्रायल रन) घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे महामेट्रोचा (Pune Metro) तीन डब्यांचा एक कोच मे महिन्यात दाखल होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

महामेट्रो प्रकल्पा अंतर्गत पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात मेट्रोचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी दरम्यान सहा किलोमीटर अंतरावर महामेट्रोकडून मेट्रोची चाचणी घेतली आहे. त्यानंतर आता वनाज ते गरवारे महाविद्यालय दरम्यान मार्गावर ट्रायल रन घेण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर येथून आलेल्या डब्यांचा वापर केला होता. त्यापैकी अद्याप दोन कोच शिल्लक आहेत. त्यापैकी एका कोचचा वापर करून ही ट्रायल रन घेण्यात येणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.

दरम्यान पुणे मेट्रोसाठीचे एक रॅक मेपर्यंत पुण्यात दाखल होईल असे ते म्हणाले. तसेच मंडई येथील जागेचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. त्यामुळे स्वारगेट ते मंडई दरम्यान भुयारी मेट्रोचे कामास येत्या दीड ते दोन महिन्यात सुरवात होईल. मेट्रो प्रकल्पाची मुदत या वर्षाअखेर संपत आहे. त्यामुळे या वर्षभरात काम पूर्ण होणार का, याबाबत दीक्षित म्हणाले, गेल्या वर्षी कोरोनामुळे काम थांबले होते. आता सुरू असले तरी अद्याप काही अडचणी आहेत. त्यामुळे मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल, हे सांगणे आता संयुक्तिक ठरणार नसल्याचे ते म्हणाले.