Covid -19 संदर्भात केंद्राने जारी केल्या मार्गदर्शक सूचना, ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनसाठी विशेष सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गृह मंत्रालयाने कोविड -19 च्या देखरेखीसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविल्या आहेत. मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनचे काळजीपूर्वक सीमांकन केले जाणे सुरू राहील. यासह, या झोनमधील निर्धारित प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असेल. कोविड -19 योग्य वर्तनास प्रोत्साहन दिले जाईल आणि काटेकोरपणे अंमलात आणले जाईल.

मंत्रालयाने म्हटले होते की, सक्रिय आणि नवीन कोविड -19 प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. परंतु जागतिक स्तरावर होणाऱ्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ आणि ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या विषाणूचा प्रकार लक्षात घेऊन देखरेख, प्रतिबंध आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गृह मंत्रालयाने म्हटले आहे की कोणत्याही क्रियाकलापांसाठी त्याकरिता जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रियेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

देशात समोर आली 20 हजाराहून अधिक प्रकरणे

दरम्यान, भारतात कोविड – 19 च्या 20,021 नवीन घटनांनंतर सोमवारी देशात संसर्ग होण्याचे प्रमाण 1,02,07,871 पर्यंत वाढले आहेत, त्यापैकी 97.82 लाखांहून अधिक लोक संसर्गमुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आणखी 279 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 1,47,901 पर्यंत वाढली आहे.

आकडेवारीनुसार, 97,82,669 लोक संसर्गमुक्त झाल्याने, देशातील रूग्णांचा रिकव्हरी रेट 95.83 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कोविड -19 ने मृत्यूचे प्रमाण 1.45 टक्के आहे. सलग सातव्या दिवशी देशात उपचार घेत असलेल्यांची संख्या तीन लाखांपेक्षा कमी आहे. सध्या कोरोना विषाणूवर 2,77,301 लोक उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांच्या 2.72 टक्के आहे.

भारतात, 7 ऑगस्ट रोजी संक्रमित झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख आणि 5 सप्टेंबरला 40 लाखांवर गेली होती. त्याचबरोबर 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला संख्या एक कोटींच्या पुढे गेेली होती.