उद्या काढण्यात येणार मुंबई म्हाडाच्या लॉटरीची सोडत 

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत उद्या (रविवारी) काढण्यात येणार असल्याचं समजत आहे. मुख्य म्हणजे या सोडतीकरीता विक्रमी 1 लाख 64 हजार अर्ज प्राप्त झाल्याचं समोर आलं आहे. उद्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान 1 हजार 384 सदनिकांची ही संगणकीय सोडत असणार आहे.
सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याची सोयदेखील उपलब्ध करण्यात आली आहे. कारण म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सोडत कार्यक्रम सुरू होण्यापुर्वी करण्यात येणाऱ्या तयारीचेदेखील थेट प्रक्षेपण सकाळी साडेसात वाजल्यापासून संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागणार आहे.
 व्यासपीठावर होणाऱ्या संगणकीय सोडतीचे प्रक्षेपण पाहता यावे यासाठी  म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडप उभारण्यात आला असल्याचंही समजत आहे. इतकेच नाही तर म्हाडा भवनाच्या प्रांगणातील मंडपात पाच मोठ्या आकाराचे एलईडी स्क्रीन्सदेखील लावण्यात आले आहेत.
म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण, मुंबई इमारत दुरूस्त्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपटटी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा यावेळी उपस्थित राहणार आहेत.