‘MI Note 5’ चा स्फोट घराला लागली आग पती-पत्नी ३५% भाजले मुलं जखमी 

शहापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल घात करतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं आहे पाहिलं आहे. शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या नोट ५ या मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. राजू शिंदे आणि रोशनी शिंदे असे या दाम्पत्याचे नाव असून ते दोघेही यात ३५ टक्के भाजले आहेत. तर त्यांची लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.
कासार आळीतील प्रतीक्षा अपार्टमेंट येथे तळमजल्यावर शिंदे कुटुंबीय राहतात. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास राजेश शिंदे मोबाइल चार्जिंगला ठेवून परत झोपले. थोड्यावेळाने अचानक बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटचा मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील अन्य रहिवासी आणि शेजारची लोक मदतीसाठी शिंदे कुटुंबीयांच्या घराच्या दिशेने पळाले. त्यांनी पाणी व माती फेकून आग विझवली व शिंदे कुटुंबियांना शहापूर उपजिल्हारुग्णालयात नेले.
या दुर्घटनेत राजेश व रोशनी शिंदे या दाम्पत्यासह त्यांची ऋतुजा व अभिषेक ही दोन मुले भाजली आहेत. शिंदे दाम्पत्य गंभीररीत्या भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोबाइल बॅटरीचा स्फोट झाला त्यावेळी घरातील गॅस सिलिंडरमधूनही गळती सुरु होती. त्यामुळेच हा स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. तर अग्निशमन दलाने अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे सांगितले.

मोबाईल चा स्फोट टाळण्यासाठी काय करावे? 
मोबाईलचा स्फोट होणे ही आजकाल सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. मोबाईल फोनच्या स्फोटाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु हे खुप भयानक आहे आणि फोनची बॅटरी फुटल्यामुळे तुम्ही गंभीर जखमी होऊ शकता. हे टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया काही अशा गोष्टी ज्यामुळे असे अपघात टाळता येतील.
-आपल्या फोनचे वेगवेगळ्या (अनेक) चार्जरशी संबंध ठेवु नका. थोडक्यात आपल्या मोबाईल सोबत जो चार्जर आला असेल त्याच              चार्जरने मोबाईल चार्जिंग करा.
-आपला फोन सतत (वांरवार) चार्जिंग करु नका.
-फोन रात्री चार्जिंगला लावून झोपू नये.
-फोन चार्ज होते वेळी फोनवर बोलणे,गेम खेळणे, इंटरनेटचा वापर करणे टाळावे.
-फोनवर कोणताही बाह्य दबाव पडणार नाही याची काळजी घ्या.
-कोणत्याही कारणाने बॅटरी खराब झाल्यास त्याच कंपनीच्या बॅटरीची निवड करा. लोकल बॅटरी घेऊ नका.
-आपण जास्त दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल तर आपल्या फोनचा चार्जर बरोबर घेऊन जावे.
-आपला फोन आपल्या हातातून निसटून खाली पडतो. त्यामुळे आपल्या फोनच्या बॅटरी मध्ये लिकेज होण्याची शक्यता असते. यामुळे       आपला फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे.