Micromax भारतीय स्मार्टफोन बाजारात परतणार, पुढील महिन्यात लाँच होणार अनेक SmartPhone !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा भारतीय स्मार्टफोन बाजारात पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. चीनी कंपन्यांच्या प्रवेशामुळे मायक्रोमॅक्स, लावा आणि इंटेक्ससारख्या देशांतर्गत कंपन्यांचे नुकसान झाले होते आणि यामुळे या कंपन्या भारतीय स्मार्टफोनमध्ये मागे राहिल्या होत्या. परंतु यादरम्यान चीनशी संघर्ष होण्याच्या कालावधीत आणि भारतात चिनी उत्पादनांच्या बॉयकॉटचा फायदा घेण्यासाठी मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

मात्र यावेळी देशांतर्गत मोबाईल कंपन्यांनाही सरकारचा पाठिंबा मिळत आहे. सरकारने कंपन्यांसाठी पीएलआय योजना जाहीर केली आहे. दरम्यान मायक्रोमॅक्स कंपनीचे सह-संस्थापक राहुल शर्मा यांनी एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये भारत सरकारच्या आत्मनिर्भर योजनेबद्दल बोलले आहे. राहुल शर्मा यांनी एक ट्विट केले आहे, ज्यात एक व्हिडिओ आहे. यात लोकांना कंपनीच्या रिव्होल्यूशनशी जोडण्याबद्दल बोलले आहे. अशा परिस्थितीत संकेत मिळत आहे की, कंपनी लवकरच आपले नवीन डिव्हाइस बाजारात आणू शकते.

दिवाळीच्या आधी फेस्टिवल सीजन देखील सुरू होणार आहे, त्यामुळे कंपनी आपल्या मोबाइल उत्पादनांची श्रेणी पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये बाजारात आणू शकते. कंपनी या स्मार्टफोनची श्रेणी १५,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणणार आहे. हे स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि MediaTek Helio चिपसेटसह लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनीने बराच काळ कोणताही स्मार्टफोन बाजारात आणलेला नाही.

कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये iOne Note बाजारात आणला होता. कंपनीचा स्मार्टफोन अद्यापही ८,१९९ रुपयांमध्ये ऑनलाइन सूचीबद्ध आहे. या वेळी जर कंपनीने एखादे चांगले डिव्हाइस आणले, तर चीनविरोधी सेंटीमेंटचा फायदा कंपनी नक्कीच घेऊ शकेल. मायक्रोमॅक्स व्यतिरिक्त इंटेक्स ही आणखी एक कंपनी आपले फोन बाजारात आणू शकते. मात्र लावाने अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आणला आहे.