मायक्रोसॉफ्टनं 32 बिट लॅपटॉप आणि कॅम्प्युटरसाठी बंद केला विंडोज 10 चा ‘सपोर्ट’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   विश्वविख्यात सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने 2020मध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पहिल्यांदा त्यांनी विडोज 7 चा सपोर्ट बंद केला आणि आता 32 बिट लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसाठी विंडोज 10 चा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मे 2020 पासून 32 बिट असलेल्या सिस्टिममध्ये विंडोज 10 वापरता येणार नाही. विंडोज 10 वापरायचं असेल तर कमीतकमी 64 बिटचा कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

विंडोज 10 च्या 2004 च्या व्हर्जनसाठी 64 बिटची सिस्टिम वापरावी लागेल, तर 32 बिटच्या सिस्टिमसाठी मायक्रोसॉफ्ट आता कोणताही अपडेट देणार नाही. पण 32 बिट सिस्टिमवर काम करणारे विंडोज 10 सॉफ्टवेअर बंद होणार असा याचा मुळीच अर्थ नाही.जुन्या 32 बिटच्या सिस्टिममध्ये सगळे फीचर्स आणि सिक्युरिटी अपडेट्स तर मिळत राहणार आहेत. पण नव्या 32 बिटच्या सिस्टिममध्ये आता विंडोज 10 इन्स्टॉल करता येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.