एमआयडीसी तळेगाव पोलिसांनी पकडला गावठी कट्टा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी तळेगाव परिसरातील इंदोरी येथे गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कधीच चर्चेत नसणाऱ्या या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी कामगिरी केल्याने हे पोलिस ठाणे चर्चेत आले आहे.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग आणि चाकणचा काही भाग कमी करुन हे पोलिस ठाणे सुरु करण्यात आले आहे. मात्र कमी मनुष्यबळामुळे पोलिस ठाणे असूनही नसल्यासारखेच आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि स्वतंत्र तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे झाल्यानंतर कोणतीच मोठी अशी कामगिरी झालेली नव्हती.

पोलिस आयुक्त संदीप बिश्नोई यांनी गुन्हेगारी उच्चाटन आणि बेकायदेशीर हत्यारे पकडण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांना इंदोरी येथे हॉटेल जायका समोर एक जण गावठी कट्टा घेऊन थांबला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप बिश्नोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उंडे, सहाय्यक निरीक्षक इस पाटील, हवालदार चव्हाण, आंबेकर, सोरटे, कोकणे यांनी सापळा रचुन संशयितास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 15 हजार रूपये किमतीचा गावठी कट्टा मिळाला. तपास पोलिस करत आहेत.