MIDC ची वेबसाइट हॅक करून मागितली 500 कोटींची खंडणी? प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MIDC ची वेबसाईट हॅक करून सायबर हल्लेखोरांनी तब्बल 500 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र खंडणीच्या या धमकीला दाद न देता MIDC च्या तंत्रज्ञांनी पूर्ण डाटा मिळवत संपूर्ण संगणक यंत्रणा सुरळीत करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. सायबर हल्ला यशस्वीपणे परतविण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मदत घेत असल्याचे MIDC च्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी पहाटे रॅन्समवेअरचा सायबर हल्ला एमआयडीसीच्या संगणक प्रणालीवर झाला. त्यामुळे सर्व संगणकीय व्यवहार ठप्प झाले होते. संगणकीय यंत्रणा बंद पाडत सायबर हल्लेखोरांनी एक धमकीचा संदेश पाठविला. तुम्हाला आधी विशिष्ट रक्कम भरावी लागेल, तरच तुमची वेबसाईट सुरू केली जाईल, अशी धमकी दिली होती. तसेच एक विशिष्ट लिंक देऊन त्यावर संपर्क करण्यास सांगितले होते.

हल्लेखोरांनी 500 कोटींची खंडणी मागितली होती, असा दावा काही चॅनेल्सनी केला होता. मात्र अशी कोणतीही रक्कम हल्लेखोरांनी नमूद केली नसल्याचे एमआयडीसीच्या अधिका-यांनी सांगितले. दरम्यान MIDC च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नेटवर्कवरून संगणक खंडित केले. महामंडळाची एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली, पाण्याची देयके आदीच्या बॅकअप फाईल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित केल्या असून त्या सुरक्षित आहेत. महामंडळाची वेबसाईट, एक खिडकी योजना, बीपीएएमएस या ग्राहकाभिमुख सेवा योग्य तपासणी करून चालू केल्या आहेत.