प्रेयसीची हत्या करून मृतदेहासोबत 45 मिनिटे दुबईत फिरत राहिला भारतीय

दुबई : वृत्तसंस्था – संयुक्त अरब अमीरात (यूएई) मध्ये राहणार्‍या एका भारतीयाने प्रेयसीची हत्या करून आपल्या कारमध्ये तिचा मृतदेह ठेवून तो 45 मिनिटे दुबईत फिरत होता. ही घटना मागच्या वर्षी जुलैमधील आहे. याप्रकरणी रविवारी दुबईच्या न्यायालयात प्रथम सुनावणी झाली. फिर्यादी पक्षाने आरोपीला मृत्यूदंड देण्याची मागणी केली आहे.

घटनेचा तपास करणार्‍या पोलीस अधिकार्‍याने न्यायालयात सांगितले की, 27 वर्षीय आरोपीची प्रेयसीसुद्धा भारतीय होती. मुलीचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समजल्याने रागाच्या भरात आरोपीने तिचा गळा कापून हत्या केली होती. पोलीस अधिकार्‍याने सांगितले, जेव्हा आरोपी रक्ताने माखलेल्या कपड्यांनी पोलीस ठाण्यात आला तेव्हा आम्हाला धक्का बसला. आरोपीने सांगितले, त्याने त्याच्या प्रेयसीची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर पडला आहे.

कारच्या मागच्या सीटवर रक्ताने माखलेला मोठा चाकूदेखील मिळाला. पोलीसांच्या माहितीप्रमाणे, एका मॉलच्या बाहेर कारमध्ये दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने मुलीचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने जवळच्या रेस्टॉरन्टमध्ये जाऊन जेवण केले. तेथून एक पाण्याची बाटलीसुद्धा खरेदी केली होती. स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी आरोपी संपूर्ण दुबईत फिरत होता.