इराणमध्ये केरळाचे मच्छिमार अडकले, बाहेर काढण्याची विनंती, कोरोनाने मरणार्‍यांची संख्या झाली 54

नवी दिल्ली /तेहरान : वृत्तसंस्था – इराणमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप आता सुरू झाला असून यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांमध्ये भारतातील केरळमधील मच्छिमार देखील आहेत. केरळच्या 17 मच्छिमारांनी इराणला एक व्हिडिओ मेसेज पाठवून त्यांना तेथून बाहेर काढण्याची विनंती केली आहे. केरळच्या विझिनजाम, पूवर आणि पोझियूर गावातील या लोकांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे इराण सरकारने लावलेल्या अनेक प्रतिबंदामुळे हे लोक एका खोलीत अडकून पडले आहेत.

व्हिडिओ मेसेजमध्ये केरळच्या या लोकांनी म्हटले आहे की, आम्ही चार महिन्यापूर्वी भारतातून इराणला मच्छी पकडण्यासाठी आलो होतो, परंतु आता कोरोना व्हायरसमुळे खोलीच्या बाहेर पडून जवळच्या लोकांनाही भेटू शकत नाही. आम्हाला भारतात परतायचे आहे. आमच्या परिवाराला भेटायचे आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तानुसार गुजरातचे 200 पेक्षा जास्त लोक इराणमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुद्धा सरकारला मदतीसाठी विनंती केली आहे.

केंद्र शासित जम्मू काश्मीरच्या विविध राजकीय पक्षांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की, त्यांनी इराणमध्ये फसलेल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढावे. जम्मू काश्मीरचे सुद्धा शेकडो लोक इराणमध्ये अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि धार्मिक यात्रेसाठी गेलेल्यांचा समावेश जास्त आहे. या लोकांना देशात परत आणण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सैफूद्दीन सोज यांनी सुद्धा केंद्राला विनंती केली आहे.

इराणमधील स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार इराणमध्ये रविवारी कोरोना व्हायरसच्या संसर्गाने आणखी 11 लोकांचा मृत्यू झाला. तसेच आणखी 385 लोकांना संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 978 प्रकरणे समोर आली आहेत. तर दक्षिण कोरियात कोरोना व्हायरसची 586 नवी प्रकरणे समोर आली आहेत. या नव्या प्रकरणांसह देशातील कोरोनाच्या रूग्णांची एकुण संख्या 3,736 झाली आहे.