मुंबई आणि परिसरातील वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता ?, उर्जामंत्री नितीन राऊतांकडून संशय व्यक्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी सकाळी १० च्या सुमारास मुंबईसह परिसरातील शहरांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे काही काळ जगजीवन ठप्प झाले. भ्रमणध्वनी सेवा आणि इंटेनरनेट सेवा कोलमडल्या. रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा मात्र जनित्रावर चालवण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

ट्विट करत राऊत म्हणाले, ‘सोमवार दिनांक १२.१०.२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,’ असे त्यांनी म्हटलं आहे. यामुळे चर्चेला उधाण आलं असून, मुंबई आणि परिसरात घातपात घडवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता का असा, सवाल आता उपस्थित होत आहे.

वीजपुरवठा खंडित मुंबई व परिसर ठप्प

महापारेषणच्या ४०० के. व्ही. च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरु होती. त्यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, रेल्वेसह, रस्तेवाहतुकीची सिग्नल यंत्रणा बंद पडली. कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. घरातून काम करणाऱ्यांचे संगणक बंद पडले. इंटरनेटसह दूरध्वनीसेवा विस्कळीत झाली.

महापारेषणने दुरुस्तीचे काम हाती घेतले, पण सायंकाळपर्यंत सुमारे ६० ते ७० टक्के भागातच वीजपुरवठा सुरु होऊ शकला. त्यात प्रामुख्याने रेल्वे आणि रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरु करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी विविध ठिकाणी अनेक भागात लाखो लोकांचे विजेअभावी हाल झाले.