मध्यप्रदेश, UP आणि बिहारमध्ये दुर्घटना : महाराष्ट्रातून ‘घरवापसी’ करणाऱ्या 8 जणांसह 16 प्रवाशी मजुरांचा मृत्यू, 66 जखमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लॉकडाऊनमध्ये गावी जाण्यास पुरेशी व्यवस्था न झाल्याने पायी जाणारे तसेच ट्रकमधून धोकादायक प्रवास करणार्‍या मजूरांवर घाला घातला गेला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या तीन अपघातात १६ कामगार ठार झाले असून ६६ जण जखमी झाले आहेत.
पंजाबहून बिहारमधील आपल्या गावी पायी जाणार्‍या मजूरांना एका बसने चिरडले. त्यात ६ जणांचा मृत्यु झाला आहे.

मुजफ्फरपूर -सहारनपूर या महामार्गावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यु झाला असून ४ जण जखमी आहेत. घलौली चेकपोस्टपासून काही अंतरावर असलेल्या रोहाना टोल प्लाझाजवळ भरधाव आलेल्या बसने या कामगांराना चिरडले. त्यात ६ जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी असलेल्या ४ जणांवर मेरठ मेडिकल रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

दुसरा अपघात मध्य प्रदेशातील गुना येथील कँटोंमेंट भागात झाला.
भरधाव बसने ट्रकला दिलेल्या धडकेत ट्रकमधील ८ कामगारांचा जागीच मृत्यु झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार महाराष्ट्रातून ट्रकमधून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी जात होते. ट्रकमधून हे सर्व ५८ हून अधिक लोक प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर प्रदेश परिवहन विभागाच्या बसची ट्रकला धडक बसली.

त्यात ८ कामगार ठार झाले आहेत. हे आठही कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तिसरा अपघात बिहारमधील समस्तीपूर येथे बस आणि ट्रक यांच्यामध्ये झाला़ या अपघातात २ मजूरांचा मृत्यु झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.