पुरंदर तालुक्यातील परप्रांतिय मजुरांची वैद्यकीय तपासणी

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रोगाचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नसल्याने बिगारी कामगार व परप्रांतीय मजुरांनी आता आपल्या गावी पलायन करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. शासनाने केलेल्या निर्णयाने जणू काही एक संजीवनी मिळाली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींचे पालन करून सर्व राज्यातील व राज्याबाहेरील कामगार आता परतीच्या मार्गासाठी आवश्यक ती जरूरत पूर्ण करीत आहेत. पुरंदर तालुक्यातुन सर्व राज्यातील व परप्रांतीय मजुरांना वैद्यकीय तपासण्याची मोहीम तहसिलदार रुपाली सरनोबत यांनी आज दि. ०५ मे रोजी सुरू केली आहे. प्रामुख्याने सासवड, जेजुरी, नीरा, भिवडी व ज्या गावांमध्ये तपासणीची सुविधा आहे अशा ठिकाणी तपासणी सुरू केली आहे.

सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये ही तपासणी चालू केली तेव्हा पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते. सासवडमध्ये साधारण पाचशे ते सहाशे मजुरांची तपासणी केली आहे. तालुक्यातून दोन ते अडीच हजार मजुरांची तपासणी करण्यात येत आहे.शासकीय डॉक्टर व ग्रामीण संस्थेच्या तर्फे धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ अमोल हेंद्रे,आनंदी हॉस्पिटलचे डॉ.सुमित काकडे, डॉ. प्रमोद वाघ, डॉ. संजय गळवे, डॉ. प्रविण जगताप, डॉ. दीक्षित, डॉ. ओंकार पोटे, डॉ. विशाल गावडे व आनंदी हॉस्पिटलचा स्टाफने प्रामुख्याने भाग घेतला होता. एम.बी.बी.एस. डॉक्टर सुद्धा तपासणी करून वैद्यकीय दाखले देऊ शकतात.

वैद्यकीय दाखले मिळाल्यानंतर आम्ही तयार झालेली यादी मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे पाठवून देणार आहोत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे हे संबंधित मजुरांच्या जिल्हाधिकारी यांना ती यादी पाठवणार असून जर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांना घेण्यास परवानगी दाखवली तरच आम्ही या मजुरांना सोडणार आहोत. महाराष्ट्रातील मजुरांना घेऊन जाण्यासाठी राज्य परिवहन विभागाची बोलणी चालू आहे अशी माहिती तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.