गुन्हे शाखेचे मिलिंद काठे CIU चे प्रभारी, आता गुन्हे शाखेला मिळाले 24 नवीन अधिकारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (CIU) तत्कालीन प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. अशात मनसुख हिरेन हत्या प्रकरणातही तेच प्रमुख आरोपी असल्याचा संशय NIA ला आहे. दरम्यान वाझे यांच्या रिक्त झालेल्या जागी गुन्हे शाखेच्या कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. अंबानी स्फोटक प्रकरणात काठे यांच्याकडेही एनआयएने चौकशी केली होती. अशात गुन्हे शाखेतील 65 जणांच्या बदलीनंतर मंगळवाऱी (दि. 30) गुन्हे शाखेला 24 नवीन अधिकारी मिळाले आहेत.

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी वाझे प्रकरणानंतर गुन्हे शाखेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. यात एकाचवेळी गुन्हे शाखेतील 65 अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यानंतर गुन्हे शाखेचे प्रमुख सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी याबाबतचा आदेश काढून गुन्हे शाखेत नव्याने हजर झालेल्या 24 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष दोनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्याकडे CIU ची जबाबदारी दिली आहे. तसेच कक्ष तीनमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्याकडे खंडणी विरोधी पथकाची जबाबदारी दिली आहे.