अवघ्या १४ वर्षाच्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या मजगुंड येथे सुरक्षा दलाचे जवान आणि लष्करादरम्यान झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यात अवघ्या १४ वर्षाच्या अतिरेक्याचा समावेश असून त्याचं नाव मुदासीर आहे.

मुदासीर हा हाजिन बांदीपोरा येथील रहिवासी आहे. इयत्ता ९ वी पर्यंत शिकलेला मुदासीर लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. गेल्या आठवड्यातच हातात एके-४७ घेतलेला त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ३१ ऑगस्टपासून त्याचा मित्र बिलालसोबत घरातून गायब होता.

पोलिसांच्या माहितीनुसार मुदासिर आणि बिलाल दोघेही ५ महिन्यांपासून गायब होते. त्या दोघांना घरी परत बोलावण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड प्रयत्न केले होते. ज्या दिवशी हे दोघं घरातून पळाले त्याच दिवशी हाजिन येथे एक चकमक उडाली होती आणि यामध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. त्याचा व्हायरल झालेला फोटो तीन महिन्यांपूर्वीचा असू शकतो असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या मजगुंड परिसरात दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक उडाली. सुरक्षारक्षकांनी श्रीनगर-बांदीपुरा मार्गावर नाकाबंदी करुन शोधमोहिम हाती घेतली होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, प्रत्युत्तरात सुरक्षा रक्षकांकडूनही जोरदार गोळीबाराला सुरूवात झाली. यामध्ये मुदासीरसह आणखी एक अतिरेकी ठार झाला. याशिवाय लष्कराचे पाच जवान देखील जखमी झाले.