तुर्कीत लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश, 11 जणांचा मृत्यू, दोघे जखमी

तुर्की : पोलीसनामा ऑनलाईनः तुर्कीच्या पूर्व भागात केकमीस गावाजवळ सैन्याचे एक हेलिकॉप्टर क्रॅश झाले झाले. या दुर्घटनेत एका उच्चस्तरीय अधिका-यासह 11 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 सैनिक जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. 4) दुपारी ही दुर्घटना घडली आहे. याबाबतची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या दुर्घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर गुरुवारी (दि. 4) दुपारी बिंगोल प्रांतामधील ततवानच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुपारी 2.25 मिनिटांनी त्याचा संपर्क तुटला. दुर्घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांचा दवाखान्यात मृत्यू झाला. एका स्थानिक चॅनलने सांगितल्यानुसार, हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाले आहे. यामागील कारण बर्फवृष्टी आणि धुके असू शकते. घटनास्थळावरील एका व्यक्तीने सांगितले की, एक व्यक्ती हेलिकॉप्टरच्या खाली होता, मात्र त्याच्यावर अधिक दबाव नव्हता. मी त्याच्या तोंडावरील बर्फ हटवला जेणेकरुन तो श्वास घेऊ शकेल. मी त्याला विचारले की तो ठिक आहे का? त्याने थोड्या वेळाने तो ठिक असल्याचे सांगितले. मी बर्फ हटवण्याचे काम सुरु केले. त्यानंतर मी जखमी सैनिकांना तिथून काढले आहे. यात 9 सैनिकांचा जागीच मृत्यू झाला होता. दुर्घटनेबद्दल तुर्कीच्या नॅशनॅलिस्ट पार्टीचे नेता डेवलेट बाहसेली यांनी ट्विट केले आहे.