पेट्रोलनंतर आता दूधही महागणार; 1 मार्चपासून तब्बल 12 रुपयांनी वाढणार दर ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता दुधाच्या दरातही वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. हे दूध जवळपास 12 रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात दुधाच्या किमतीत 12 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. रतलाम मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 25 गावांची एक बैठक झाली. या बैठकीत दुधाचे दर वाढण्यावर एकमत झाले. त्यानुसार, येत्या 1 मार्चपासून दुधाचे दर वाढवले जाणार आहेत. रतलामच्या काही गावांतील दूध उत्पादकांनी दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या वर्षीही दूध उत्पादकांनी दुधाचे दर वाढविण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे दुधाचे दर वाढवले गेले नाहीत. त्यामुळे आता दूध कोणत्याही दरवाढीविना विकले जात आहे.

दोन वर्षांपासून नाही दरात वाढ
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या संकटामुळे दरात वाढ केली गेली नाही. त्यामुळे हे दूध 43 रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. मात्र, आता यामध्ये 12 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता ही दरवाढ मान्य केल्यास ग्राहकाला या दुधासाठी प्रतिलिटर 55 रुपये द्यावे लागणार आहेत.