Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’च्या रुग्णांवर उपचार करतेय ‘मिल्खा सिंग’ची मुलगी, आपत्कालीन वॉर्डमध्ये ड्यूटीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे आणि दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या ही वाढतच आहे. आतापर्यंत जगात 25 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, तर 1 लाख 78 हजार लोक मरण पावले आहेत. जगभरातील डॉक्टर लोकांना बरे करण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत माजी ऑलिम्पियन मिल्खा सिंगची मुलगीसुद्धा अमेरिकेत लोकांना बरे करण्यात गुंतली आहे. स्वत: मिल्खा सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिल्खा सिंग यांनी सांगितले की त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर आहे. ते म्हणाले की त्यांना आपल्या मुलीचा अभिमान आहे. तसेच पुढे ते म्हणाले की त्यांची मुलगी दररोज त्यांच्याशी बोलते आणि त्यांना काळजी घेण्यास सांगते.

डॉक्टर मोना इमरजेंसी वॉर्डमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करत आहेत

मोना मिल्खा सिंह न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत. त्या कोरोनाच्या आपत्कालीन रूग्णांवर उपचार करीत आहेत. अमेरिकेत या आजारामुळे आतापर्यंत 40,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिल्खा सिंग यांचा मुलगा प्रसिद्ध गोल्फर आणि चार वेळा युरोपियन टूर चॅम्पियन राहिलेले जीव मिल्खा सिंग म्हणाले, ‘त्या न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रूम डॉक्टर आहेत. कोरोना लक्षणे असलेला एखादा रुग्ण आला की त्याच्यावर उपचार त्या करतात.’ तसेच ते म्हणाले की, ‘त्या आधी रुग्णाची तपासणी करतात, त्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डात पाठवले जाते.’

90 च्या दशकात अमेरिकेत झाल्या स्थायिक

54 वर्षीय मोना यांनी पटियालाहून एमबीबीएस केले आणि नव्वदच्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाल्या. जीव म्हणाले की, ‘मला त्यांचा अभिमान आहे. त्या आठवड्यातून पाच दिवस काम करतात. कधी दिवसा तर कधी रात्री तर कधी बारा-बारा तास.’ ते म्हणाले, ‘मला त्यांच्याविषयी चिंता आहे. लोकांवर उपचार घेताना काहीही घडू शकते. आम्ही दररोज त्यांच्याशी बोलतो. आई बाबा देखील दररोज त्यांच्याशी बोलतात. मी त्यांना सकारात्मक राहण्यासाठी आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी सांगत असतो.’ त्यांनी कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या कर्मवीरांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, ‘मी देशातील प्रत्येक नागरिकास आवाहन करू इच्छितो की कोरोनाच्या विरोधात लढा देत असलेल्या प्रत्येकाचा सन्मान करावा. मग तो डॉक्टर असो, पोलिस असो की मग सफाई कर्मचारी असो. त्यांचा सर्वांनी आदर केला पाहिजे आणि त्यांची काळजी केली पाहिजे.’