कोरेगाव भीमाला लोटला लाखोंचा भीमसागर 

कोरेगाव भीमा : पोलीसनामा ऑनलाइन –  भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून मंगळवारी (1 जानेवारी) लाखो आंबेडकरी बांधव आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सकाळी आपल्या अनुयायांसमवेत येऊन विजयस्तंभाला अभिवादन केले.  राज्यातील विविध भागातून लाखो भीमसैनिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असून त्याबाबत पुणे जिल्ह्यालगतच्या जिल्ह्यातून येणाºया वाहतूकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्यवळण येथून नगरकडे वळवली आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
कोरेगाव भीमा परिसरात १ व २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा , वरुन व वज्र वाहने , अग्निशमन बंब , राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात आहेत. गावांमधुन सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर एक अधिकारी १० कर्मचारी तैनात आहेत.
कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्यासैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता.

या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ  भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. १९३८ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह  देशभरातून आंबेडकरी बांधव एक जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

कोरेगाव-भीमाच्या विजयीस्तंभावर आज उसळणार अनुयायांची गर्दी