गोडसेबद्दल तुमच मत काय ?, MP ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

पोलीसनामा ऑनलाईन – गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल तुमच मत काय? तसेच 1983 मध्ये नेल्ली (आसाम) येथे झालेल्या हत्याकांडाबाबत,1984 मधील शीख विरोध आणि 2002 मधील घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत, याचे उत्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ( RSS chief Mohan Bhagwat ) देतील का? असा सवाल एममआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन ओवेसी (MMIM chief MP Asududdin Owaisi) यांनी केला आहे. खा.ओवीसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भागवत यांना प्रश्न विचारले आहेत.

माझी देशभक्ती माझ्या धर्मातून येते. मी माझा धर्म समजूनच एक चांगला देशभक्त बनेन आणि लोकांनाही असेच करायला सांगेन. एवढंच नाही, तर स्वराज्य समजून घ्यायचे असेल, तर स्वधर्माला समजून घ्यावे लागेल असं महात्मा गांधी म्हणाले होते, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केले होते. ते ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यावरून खा. ओवेसी यांनी टीका करत गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? असा सवालही केला आहे.

धर्म कोणताही असला तरी बहुतांश भारतीय देशभक्त आहेत हे मानण तर्कसंगत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीतच एका धर्माच्या लोकांना आपोआप देशभक्तीचे प्रमाणपत्र दिले जात. तर इतरांचं जीवन आपण या ठिकाणी अस्तित्वात आहोत हे सिद्ध करण्यात आणि आपण भारतीय आहोत हे सांगण्यातच निघून जाते असेही ओवीसी म्हणाले.

काय म्हणाले होते भागवत ?
पूजा पद्धती, कर्मकांड कुठलेही असोत, मात्र, सर्वांनी एकत्रितपणे रहायला हवे. फरक म्हणजे फाटाफूट नव्हे. जोवर मनात ही भीती असेल, की तुमच्या असल्याने माझ्या अस्तित्वाला धोका आहे आणि आपल्याला माझ्या असल्याने आपल्या अस्तित्वाचा धोका वाटेल, तोवर सौदे तर होऊ शकतात, पण आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही असे भागत म्हणाले होते. वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे प्रकाशन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात, असेही भागवत यांनी म्हटले आहे.