काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍याच्या खूनाबद्दल MIM नगरसेवकाने दिली ‘धक्‍कादायक’ कबुली

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक तौफिक शेख याच्यासह दोघांना विजयपूर पोलिसांनी कर्नाटकातील धुळखेडच्या एका हॉटेलमधून रविवारी अटक केली होती. तौफीक शेख याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये आर्थिक वादातून खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अमृत निकम यांनी दिली.

रेश्मा पडेकनुर यांची हत्या केल्याची कबुली एमआयएम नगरसेवक तौफिक शेख याने पोलिसांसमोर दिली. पोलिस अधीक्षक अमृत निकम यांची पत्रकार परिषदेत माहिती, आर्थिक वाद आणि जागेच्या व्यवहारावरुन खून केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर आरोपी तौफीक हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. मात्र तो हाती लागत नव्हता.

काय आहे प्रकरण
कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनूर यांनी सोलापूरचे एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख याच्याविरुद्ध सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तर तौफिक शेख याच्या पत्नीने देखील रेश्मा पडेकनूर व तिचा पती बंदेनवाज पडेकनूर या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रेश्मा पडेकनूर यांना सतत धमक्या येत होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे काहीजण आले होते. त्यांच्याबरोबर त्या गेल्या होत्या. त्या रात्रभर न आल्याने त्यांचे पती बंदेनवाज यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता.

त्यानंतर विजयपूर जिल्ह्यातील कोलम येथे पुलाच्या खाली रेश्मा पडेकनूर यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मयत रेश्मा पडेकनूर यांचे पती बंदेनवाज पडेकनूर यांनी कोलार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून सोलापूरचे ‘एमआयएम’चे नगरसेवक तौफिक शेखसह सहा जणांविरुद्ध रेश्मा पडेकनूर यांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.