पंकजा मुंडेंचं उपोषण म्हणजे ‘नौटंकी’, MIM चे खासदार इम्तियाज जलील यांची टीका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. या उपोषणासाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या लाक्षणिक उपोषणावरून एमआयएमचे नते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, काही राजकीय नेत्यांना जनता मूर्ख असल्याचे वाटत आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांकडून औरंगाबादमध्ये होत असलेले उपोषण. सत्ता असताना मराठवाड्यातील पाणी सोडवता आला नाही. मात्र आता उपोषण करून ‘नौटंकी’ करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार देखील नाटक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

इम्तियाज जलील पुढे म्हणाले, ज्यावेळी भाजपचं राज्यात आणि केंद्रात सरकार होतं, त्यावेळी त्यांनी काय केले ? हे पुढारी नागरिकांना मूर्खात काढत आहेत. पाच वर्ष तुमचीच सत्ता होती आणि तुम्ही मंत्री होता. भाजप सरकारच्या काळात राज्यात आणि मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर होता. असे असताना सुद्धा भाजपला त्यावर नियोजन करता आले नाही. जेव्हा काम करण्याची संधी होती त्यावेळी कामे केली नाहीत. आता विरोधात गेल्यानंतर काम होत नसल्याचा आरोप करून उपोषण करत आहे. लोक तुमच्या नौटंकीला ओळखतील, असे जलील म्हणाले.