मतदार हा कोणाचा गुलाम नाही, आता बंगालमध्येही निवडणूक लढवण्यावर विचार : ओवेसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच पार पडलेल्या बिहारमधील ( Bihar) विधानसभा निवडणुकीत एनडीएने ( NDA) बाजी मारली आहे. सर्वाधिक १२५ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिहारमध्ये असदुद्दीन ओवेसी ( Assuddin Ovesi) यांच्या एमआयएमनं ( MIM) मुसंडी घेत पाच जागांवर विजय मिळवला. याचा सर्वांत मोठा फटका महागठबंधनला बसला. पण आता त्यानंतर ओवेसींनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बिहारची जनता कोणाची गुलाम नाही, आता पश्चिम बंगालमध्येही निवडणुका लढवण्यावर विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली. बिहार निवडणुका आणि अन्य मुद्द्यांवर एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओवेसी यांनी यावर भाष्य केले आहे.

ओवेसी म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आम्ही बिहारमध्ये सहा जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी पाच जागांचं आमचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. आमचा सहाच्या सहा जागांवर पराभव झाला होता. आम्ही तरीही खूप परिश्रम घेतले आणि सीमांचलच्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष दिलं. जनतेनं आम्हाला मतदान केलं आणि प्रेम दिलं. आम्हाला पुढे अजूनही मेहनत करायची आहे. त्याचबरोबर आता पश्चिम बंगालमध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या काही लोकांशी चर्चा करणार आहोत. आमच्या अनेक नेत्यांना खोट्या आरोपाखाली टीएमसीनं तुरुंगात टाकलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आम्ही लढवल्या आहेत आणि यापुढेही लढवू. पश्चिम बंगालचा निर्णय अद्याप बाकी आहे.

निर्णयापूर्वी आम्ही पक्षाच्या लोकांशी चर्चा करणार असल्याचेदेखील त्यांनी त्यावेळी सांगितले. बिहारचा मतदार गुलाम नाही. महागठबंधनच्या मुद्द्यावर भाष्य करताना ओवेसी म्हणाले, बिहारमध्ये आम्ही यापूर्वी आरजेडीच्या लोकांशी बोलणी केली होती. आम्ही प्रयत्न केले होते. परंतु त्यांनी काही मान्य केलं नाही. बिहारचा मतदार हा कोणाचा गुलाम नाही. ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आभार. मतदार आमचा गुलाम आहे आणि आम्ही त्याचा हवा तसा वापर करू असं जो पक्ष समजतो ते दिवस आता निघून गेले. तुम्हाला काम करावं लागेल आणि लोकांची मनही जिंकावी लागतील, असेही ओवेसी यांनी म्हटले. आम्हाला भाजपची बी टीम म्हटले जाते. याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. मी लहान असल्यापासून हे पाहत असल्याचेदेखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मी १३ वर्षांचा होतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोकं आमच्या घरावर ओवेसी कब्रिस्तान या पाकिस्तान असं म्हणून पळून जायचे. त्याने मला काहीही फरक पडत नसल्याचेदेखील ओवेसी यांनी स्पष्ट केले