रुग्णांसाठी वरदान ठरतेय ‘ही’ गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गुडघेदुखी सर्वत्र आढळणारी समस्या असून यावर गुडघा प्रत्यारोपण हा उपाय आहे. या शस्त्रक्रियेद्वारे वेदनादायी, नीट काम करू न शकणारे गुडघे काढून त्याजागी कृत्रिम गुडघेरोपण केले जाते. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या रुग्णांमध्ये किंवा ज्यांना सिम्प्टोमॅटिक आर्थरायटीसचा त्रास आहे अशा रूग्णांसाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. ४०-५० वर्षे वयोगटातील स्त्रियांना देखील हा त्रास होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. बैठे काम, लठ्ठपणा यामुळे कमी वयातच गुडघ्यांचे दुखणे सुरु होते.

गुडघा प्रत्यारोपणात ट्रेडिशनल मेडिकल पॅरापॅटलर अप्रोच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीमध्ये त्वचा आणि सर्वात महत्त्वाचा गुडघ्याचा सांधा कट करून मगच हाडापर्यंत पोहोचता येते. यामुळे मिनीमली इन्व्हेसिव्ह नी रिप्लेसमेंट सर्जरी गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थराइटिसच्या रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. यामध्ये सांध्याला कट दिला जात नाही. गुडघ्याच्या वास्टस् मेडिएलिस ऑब्लिक्युओस सांध्याच्या खाली जागा करून ही प्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया कमी वेदनादायी असून रुग्ण लवकर हालचाल करतो.

रूग्णाला जास्त काळ रूग्णालयात रहावे लागत नाही. तसेच ही शस्त्रक्रिया जास्त महागडीही नाही. शस्त्रक्रियेदरम्यान कमी प्रमाणात रक्त शरीराबाहेर जाते. वेदनाशामक औषधेही जास्त प्रमाणात घ्यावी लागत नाहीत. मिनीमली इन्व्हेसिव्ह नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया अशा प्रकारे सोपी व रूग्णांना लवकर दिलासा देणारी असल्याने डॉक्टर हीच शस्त्रक्रिया सुचवतात. पॅरा पॅटलर गुडघा प्रत्यारोपण केल्यास वयस्कर रुग्णांना जास्त वेदना होतात. तसेच उशीरापर्यंत व्यवस्थित हालचाल करता येत नाही. मिनीमली इन्व्हेसिव्ह अप्रोच प्रक्रियेमध्ये पारंपरिक पॅरा पॅटलर अप्रोचपेक्षा कमी वेदना आणि लवकर हालचाल करता येते.