Pune News : पुणेकरांनो 4 दिवसांत थंडी वाढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि हिंदी महासागर परिसरात चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच तमिळनाडू, पाँडिचेरी आणि कराईकल, केरळ व आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि यानाम, रायलसीमा, कर्नाटकाचा दक्षिण भारतात मंगळवारी (ता. १९) पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पळालेली थंडी पुढील चार दिवसांमध्ये पुन्हा परत येईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला.

रविवारी पुण्यात दिवसभर आकाश अंशत: ढगाळ होते. दुपारपर्यंत आकाश अंशत: ढगाळ असल्याने कमाल तापमान २.५ अंश सेल्सिअसने वाढून ३२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा १६.७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता. त्यामुळे पहाटे गारठा जाणवला नाही. तर सोमवारी (ता. १८) आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल. त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये हवामान कोरडे राहील. त्याचा थेट परिणाम हवेतील गारठा वाढण्यात होणार आहे. किमान तापमानाचा पारा ११ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल.
राज्यात हवामान कोरडे झाल्याने मागील तीन ते चार दिवसांपूर्वी किमान तापमानाचा पारा जवळपास सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. मात्र हा पारा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी-अधिक स्वरूपात असून, किमान तापमानातही चढ-उतार असल्याची स्थिती आहे.

विदर्भात किमान तापमानात घट
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडी काहीशी कमी झाली आहे. यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे, तर राज्यात ११ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान नोंदविले गेले आहे. विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागात थंडी आहे.