‘महाविकास’मधील मंत्री अन् काही आमदार नाराज, मात्र तरीही सरकार टिकेल !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधकांकडून वेगवेलगल्या प्रतिक्रिया आहेत. दरम्यान सरकार स्थापन करण्यासाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ते शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना’तील लेखातून महाविकास आघाडीच्या सरकारबाबत विविध खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर सरकार कोसळणार असे म्हणणाऱ्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

दरम्यान बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. हे मान्य आहे पण हि नाराजी केवळ मानपानाची आहे. त्यामुळे काही मंत्री आणि आमदार नाराज आहे. मात्र तरीही सरकार टिकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

महाआघाडी सरकार टिकणार नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे, असं राऊत यांनी म्हंटल आहे.

सर्वात जास्त अजित पवार विश्वासू
अटल बिहारी वाजपेयी यांनी ३३ भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अलीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष ठेवा असे सातत्याने सांगितले जाते, पण आज सगळ्यात जास्त विश्वासू अजित पवार असल्याचे स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले.

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं
सुरुवातीच्या काळात सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेसची भूमिका अस्पष्ट होती. स्वर्गीय काँग्रेसचे अहमद पटेलांसारखे नेते मात्र सकारात्मक बोलत होते. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. २२ नोव्हेंबरला नेहरू सेंटरमध्ये एक बैठक झाली. यामध्ये वाटाघाटी करण्यात आल्या. मात्र त्याच वेळी विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका मल्लिकार्जुन खरगे व अन्य काही नेत्यांनी घेतली.त्यामुळे खरगे आणि शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शरद पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल धावत गेलो.

…. अन पहाटेच अजित पवारांचे दर्शन झाले
महाआघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सत्ता स्थापनेच्या बैठकीत सुरुवातीलाच सुचवले, पण मल्लिकार्जुन खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता हे सर्व सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले अन त्यांचा फोन ‘स्विच ऑफ’झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे