टेरिटोरियल आर्मीत मंत्र्याला पहिल्यांदाच मिळालं पद; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर बनले ‘कॅप्टन’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रमोशन झालं आहे. तशी
माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नसून प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच टेरिटोरियल आर्मीतील आहे. अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. त्यावेळी ते लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आलं आहे. अनुराग ठाकूर असे पहिले खासदार आणि मंत्री आहेत ज्यांना हा बहुमान मिळाला आहे.

माजी लष्कर प्रमुख जनरल सुहाग यांनी 2016 मध्ये अनुराग ठाकूर यांना टेरिटोरियल आर्मीमध्ये सामावून घेतले होते. भाजपपासून संसदेपर्यंत आणि क्रिकेटच्या राजकारणापासून भाजपच्या स्टार प्रचारकापर्यंत आपला ठसा उमटवणारे अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धूमल यांचे पुत्र आहेत. भाजपच्या तरुण पिढीतील ते एक महत्त्वाचे नेते आहेत.

राजकारणातच नाही तर क्रिकेटच्या राजकारणात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मे 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. मात्र, एक खेळाडू म्हणून त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकच सामना खेळला आहे. त्यातही ते शून्यावर आऊट झाले होते. हिमाचल प्रदेशच्या राज्य क्रिकेट संघाचे ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष बनले नाहीत तर 2001 मध्ये 26 वर्षाच्या वयात ते सर्वात तरुण राष्ट्रीय निवड समितीत सदस्य बनले.